पुणे, दिनांक 27 जानेवारी 2025
स्थलांतरीत आणि वंचित कुटुंबांमधील मुलांच्या शिक्षणासाठी ‘डोअर स्टेप स्कूल’ ही संस्था गेल्या तीस वर्षांपासून पुण्याच्या विविध भागांमध्ये काम करत आहे. बांधकाम साईट, शहरी वस्त्या, आणि तात्पुरत्या वस्त्यांमध्ये मुलांसाठी साक्षरता वर्ग चालवले जातात; तसेच सहा वर्षांवरील मुलांना औपचारिक शाळेत दाखल करून त्यांच्या उपस्थितीसाठी व शैक्षणिक प्रगतीसाठी शाळा व पालक यांच्यासोबत काम केले जाते. तात्पुरत्या स्वरूपात देखील अभ्यासवर्गाची सोय करता येणार नाही अशा ठिकाणी संस्थेकडून ‘फिरती शाळा’ (स्कूल ऑन व्हील्स) उपलब्ध करून दिली जाते.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांच्या परीघावर वेगाने विकसित होत असलेल्या भागांमध्ये सध्या संस्थेच्या एकूण नऊ बसेस (फिरती शाळा) दररोज सुमारे एक हजार मुलांपर्यंत पोहोचत आहेत. सतत स्थलांतर करावे लागणाऱ्या समूहांपैकी दगड फोडणारे, कचरा व भंगार वेचणारे, जडीबुटी औषधे विकणारे, ट्रॅफीक सिग्नलवर खेळणी गजरे पिशव्या विकणारे, नंदीबैल घेऊन भविष्य सांगणारे, गोधडी शिवणारे, दोऱ्या विणणारे असे व्यवसाय करणाऱ्या कुटुंबांतील मुलांचा समावेश आहे.
या ‘फिरत्या शाळे’च्या प्रकल्पाला २५ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल दि. १७ जानेवारी २०२५ रोजी कोथरूड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘डोअर स्टेप स्कूल’ संस्थेचे देणगीदार, हितचिंतक, स्वयंसेवक व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. सध्या कार्यरत असलेल्या सर्व नऊ बसगाड्या (फिरती शाळा) या ठिकाणी उपस्थित पाहुण्यांना बघण्यासाठी उपलब्ध करण्यात आल्या होत्या.

या कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना, समाजाच्या सर्व स्तरांमधील मुलांच्या शिक्षणासाठी सातत्यपूर्ण व अभिनव पद्धतीचे प्रयत्न करत राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन संस्थेच्या संस्थापिका रजनीताई परांजपे यांनी केले. स्थलांतरीत कुटुंबांची राहण्याची जागा ठरलेली नसल्याने त्यांची मुले औपचारिक शाळेत जात नाहीत आणि अनौपचारिक पद्धतीने त्यांच्यासोबत किती दिवस काम करता येईल हेही सांगणे कठीण असते; त्यामुळे सलग १२० दिवस त्यांच्यासोबत दररोज एक तास काम करून मराठी भाषा (देवनागरी लिपी) वाचण्याची क्षमता निर्माण करता येईल अशी पध्दत वापरण्याचे संस्थेने ठरवले आणि त्यानुसार आजपर्यंत हजारो मुलांना किमान वाचन कौशल्य शिकवता आल्याचे त्यांनी सांगितले. असे असले तरी, शिक्षणाचे उद्दीष्ट एका पिढीत साध्य होईलच असे नाही, त्यासाठी साधारणपणे तीन पिढ्यांवर सातत्याने काम करावे लागते असा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी अनेक कायदे, धोरणे, तरतुदी करूनदेखील पुण्यासारख्या शहरात आजही इतक्या मुलांना एखाद्या बसमध्ये बसून शिक्षण का घ्यावे लागते, याचाही विचार केला पाहिजे, असे प्रांजळ मत रजनीताई परांजपे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक व प्रमुख मार्गदर्शक विवेक सावंत यांनी यावेळी बोलताना मुलांच्या भाषिक, गणिती व तार्कीक बुध्दीमत्ता विकासावर ‘डोअर स्टेप स्कूल’तर्फे केल्या जाणाऱ्या कामाचे कौतुक केले.
सुपर कॉम्प्युटरसाठी लागणारे सॉफ्टवेअर व हार्डवेअर आपण तयार केले; परंतु तळागाळातील माणसांना पिण्याचे पाणी शुद्ध करून देण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, याबद्दल काही प्रयोग व अनुभव त्यांनी सांगितले. विविध भाषा बोलणाऱ्या व विविध राज्यांमधून स्थलांतर करून आलेल्या कुटुंबांमधील मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षणशास्त्रानुसार अभ्यासक्रम विकसित करण्यामध्ये संस्थेला मदत व मार्गदर्शन करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
‘फिरती शाळा’ (स्कूल ऑन व्हील्स) प्रकल्पाच्या कामाची माहिती देणारा माहितीपट यावेळी उपस्थितांसमोर प्रदर्शित करण्यात आला. या ‘फिरत्या शाळे’मुळे शिक्षणाच्या प्रवाहात आलेल्या व सध्या उच्च शिक्षण घेत असलेल्या युवक-युवतींनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
