प्रा. विजयकुमार खंदारे
शरणकुमार लिंबाळे यांची ‘वंदे मातरम्’ ही कादंबरी नुकतीच म्हणजे 15 ऑगस्ट 2022 ला पुण्यातल्या दिलीपराज प्रकाशनाने प्रकाशित केली. लिंबाळे यांना नुकताच सरस्वती सन्मान हा राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार प्राप्त झाला. त्यामुळे आंबेडकरी समाजात एक प्रकारे वादळी चर्चा झाली. लिंबाळे यांनी सरस्वती सन्मान स्वीकारू नये, अशा प्रकारची मागणी पुढे आली. परंतु सरस्वती सन्मान हा भारतीय लेखकांसाठी दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. या पुरस्काराचे नाव ‘सरस्वती’ असे आहे. त्यामुळे दलितांनी या नावाला विरोध केला. ‘सरस्वती सन्मान’ हा पुरस्कार आहे, सरस्वती देवता नाही. याचे भान विरोध करणा-यांकडे नव्हते. त्यांचा विरोध हा एकांगी स्वरूपाचा आहे.
‘वंदे मातरम्’ या कादंबरीतील दलित कार्यकर्ता दिनेश कांबळे आणि दलित लेखक दयानंद किणीकर यांच्यातील संवादावरून हे अधिक लक्षात येईल असे किणीकर यांच्या तोंडी ‘‘सरस्वती हे कॉलनीचं नाव आहे. कॉलनी म्हणजे सरस्वती नव्हे. या कॉलनीत दलित स्त्रिया सफाईचं काम करतात. घरकाम करतात. त्यांचं काम बंद करणार का? सरस्वती मार्केटमध्ये अनेक दलित काम करतात. त्यांना कामावरून हाकलणार का? तारतम्य ठेवून बोला. ‘सरस्वती’ ही विद्येची देवता आहे, असं हिंदू मानतात. ती देवता वेगळी आणि ही कॉलनी वेगळी. लोकांचा बुद्धीभेद करू नका.’’ (पृ. 84) अशा आशयाची वाक्ये येताना दिसतात.
दलित साहित्य गेली पन्नास वर्षे लिहिले जात आहे. या साहित्याची अवहेलनाच होत आहे. दलित साहित्यात वाड्ःमीयन मूल्ये नाहीत. हे साहित्य प्रचारकी आणि सवंग स्वरूपाचे आहे, अशी टीका अनेकवेळा झाली आहे. या पार्श्वभूमीवर लिंबाळे यांच्या कादंबरीला ‘सरस्वती सन्मान’ मिळाला आहे. त्याचे महत्त्व सामाजिकदृष्टया अनन्यसाधरण आहे.
‘सनातन’ कादंबरीमुळे दलित साहित्याचा वाड्ःमयीन दर्जा किती श्रेष्ठ प्रकारचा आहे, हे सिद्ध झाले आहे. दलित साहित्यही कलेच्या कसोटयावर श्रेष्ठ दर्जाचे ठरते याचे प्रमाण सरस्वती सन्मानामुळे स्पष्ट झाले आहे. लिंबाळे हे भारतीय पातळीवरील लेखक आहेत. समाजात निर्माण होणा-या प्रत्येक प्रश्नाला त्यांनी उत्तरे दिली आहेत. ही त्यांची नेहमीची पद्धत आहे.
सरस्वती सन्मान प्राप्त झाल्यानंतर जो वाद झाला त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी लिंबाळे यांनी अनेक मुलाखती दिल्या आहेत. त्या वर्तमानपत्रातून आणि नियतकालिकांमधून प्रकाशित झाल्या आहेत. त्या मुलाखतीचे संपादन ‘समन्वय’ या नावानेही प्रकाशित झाले आहे.
लिंबाळे यांनी ‘वंदे मातरम्’ ही कादंबरी लिहून आंबेडकरी समाजातल्या आक्रमक आणि बुद्धिभेद करणा-या लोकांवर एक प्रकारचा वाड्ःमयीन हल्ला केलेला आहे. लेखक-विचारवंतावर हल्ले होण्याचा प्रकार काही नवा नाही. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्यावर खुनी हल्ले झालेले आहेत. अशी पार्श्वभूमी असलेली ‘वंदे मातरम्’ ही कादंबरी आहे.
‘वंदे मातरम्’मधील नायक दयानंद किणीकर हा दलित लेखक आहे. त्याच्या दलित लेखनाला आंबेडकरवादी समाजाकडून विरोध होतो. ‘दलित लेखक दलित साहित्य लिहून, समाजाची बदनामी करतात आणि प्रसिद्धी मिळवतात. त्यामुळे ‘दलित साहित्य’ लिहिणे बंद झाले पाहिजे आणि ‘बौद्ध साहित्य’ लिहिले पाहिजे.’’ अशी मागणी वारंवार होते आहे. या कादंबरीतील दिनेश कांबळे ही व्यक्तिरेखा दलित लेखक किणीकर यांच्या लेखनासंदर्भात कडाडून विरोध करताना दिसते. (पृ. 83 पहा.)
शरणकुमार लिंबाळे यांनी समाजात घडणा-या कटू वास्तवावर प्रखर प्रकाश टाकण्यासाठी ‘वंदे मातरम्’ ही कादंबरी लिहिली आहे. दलितच दलिताचा कसा छळ करतात याचे दाहक वर्णन या कादंबरीत प्रकट झाले आहे. दलित लेखकाच्या लेखनाला केवळ दलितच विरोध करतात असे नाही तर जातीवादी प्रवृत्तीचे लोकही विरोध करतात, याचेही वर्णन ‘वंदे मातरम्’ या कादंबरीत प्रकट झाले आहे.
मल्हार पांडे हा हिंदुत्ववादी कार्यकर्तो तो किणीकर यांच्या लेखनाला विरोध करताना दिसतो. ‘‘आता तुम्ही धर्मांतर केले आहे. तुमचा हिंदू धर्माशी काही संबंध नाही. तेव्हा हिंदू धर्माविषयी काही लिहू नका. हिंदू धर्माविरूद्ध लिहून प्रसिद्धी मिळवू नका. तुम्हाला लिहायचेच असेल तर तुमच्या जातीविषयी, बौद्ध धर्माविषयी लिहा.’’ अशी प्रतिक्रिया मल्हार पांडे व्यक्त करताना दिसतो. (पृ. 115-116 पहा.)
दिनेश कांबळे असो किंवा मल्हार पांडे असो, या दोन व्यक्तिरेखा आक्रमक विचारांच्या आहेत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला विरोध करणा-या आहेत. याच प्रवृत्तीने दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांचे खून केले. तोच धागा पकडून लेखकाने ‘वंदे मातरम्’ या कादंबरीत आक्रमक विचारांच्या दलित कार्यकर्त्यांकडून खून घडवून आणले आहे. दलित लेखकांवर दलित आणि सवर्णांकडून कशाप्रकारे बंधने येतात याचे चित्रण आजवर कुठल्याही दलित कलाकृतीमधून झालेले नव्हते.
लेखकाने स्व-समाजातील अपप्रवृत्तीला उघडे पाडण्यासाठी ‘वंदे मातरम्’ ही कादंबरी लिहिली आहे. एक प्रकारे झुंडशाही आणि हिंसेला साहित्यातून उत्तर देणारी कलाकृती म्हणून ‘वंदे मातरम्’कडे पाहावे लागेल.
किणीकर हे राखीव जागेतून नोकरीला लागलेले दलित अधिकारी आहेत. त्यांनी सरस्वती कॉलनीमध्ये घर खरेदी केले आहे. दलित माणूस शिकला. नोकरीस लागला की तो दलित समाजापासून तुटतो आणि दलित समाजासाठी काही करत नाही, अशा पद्धतीची टीका नेहमीच होताना दिसते. या जळजळीत वास्तवावर आधारित ‘वंदे मातरम्’ ही कादंबरी लिहिली आहे. किणीकर सरस्वती कॉलनीत राहत असल्यामुळे दलित त्याला विरोध करतात. सरस्वती कॉलनीत ब्राह्मण राहत असल्याने किणीकरला भटाळलेला म्हणून दलित नावे ठेवतात. तर याउलट ब्राह्मण समाज किणीकरला दलित म्हणून स्वीकारत नाहीत. दलितही स्वीकारत नाहीत आणि ब्राह्मणही स्वीकारत नाही. अशा अवस्थेत किणीकर जगतो. किणीकर कुटुंबाची दलित आणि सवर्णांमधील जातीयवादामुळे कशी फरफट होते, याचे अत्यंत मार्मिक वर्णन या कादंबरीमध्ये प्रकट झाले आहे.
राखीव जागेमधून नोकरी लागलेल्या दलितांविषयी दलित आणि दलितेतरांमध्ये जो रोष आहे तो ‘वंदे मातरम्’ या कादंबरीत प्रकट झाला आहे. या कादंबरीतील गार्गी ही ब्राह्मण व्यक्तीरेखा परिवर्तनवादी विचार करणारी आहे. गार्गी विद्यापीठामध्ये ‘दलित आत्मकथनां’वर पीएच.डी. पदवीसाठी संशोधन करत असते. त्यामुळे तिची आणि किणीकरची भेट होते. किणीकर बरोबर ती नेहमीच दलित साहित्याविषयी चर्चा करत असते. (पृ. 21 ते 23, 40, 41, 69, 80, 110) ‘बलुतं’, ‘पाडेवार’, ‘सांगावा’, ‘उरवूंड’ अशा शब्दांचे अर्थ जाणून घेते. त्याचबरोबर गार्गी किणीकरांना आत्मकथा लिहिण्याविशयी सुचवते. दलित आत्मकथा लिहिण्याची प्रेरणा आणि प्रवृत्ती याविषयीचे विश्लेषण ‘वंदे मातरम्’ कादंबरीत विस्ताराने व्यक्त झालेले आहे. आत्मकथा लिहू इच्छिणा-यांसाठी ही कादंबरी एका मार्गदर्शकांप्रमाणे झाली आहे. आत्मकथा कशी लिहावी? आत्मकथेमध्ये कोणते अनुभव महत्त्वाचे आहेत. आत्मकथेचा समाजावर कसा परिणाम होतो, याची चर्चा या कादंबरीत झालेली आहे. लेखन आणि चिंतन कसे करावे? याविषयीचे मूलगामी मार्गदर्शन या कादंबरीतून लेखकाने केलेले आहे.
शरणकुमार लिंबाळे यांची लेखनशैली आणि भाषेवर असलेले प्रभूत्व याचा अभ्यास करण्यसाठी ‘वंदे मातरम्’ ही कादंबरी महत्त्वाची ठरू शकते.
अत्यंत छोटया छोटया वाक्यांमधून ही कांदबरी लिहिली आहे. या लेखनामध्ये उपमा आणि प्रतिकांची रेलचेल आहे. (पृ. 49 ते 51) लेखकानी आपले चिंतन मुक्तपणे उधळून दिले आहे. त्यामुळे ‘वंदे मातरम्’ ही कादंबरी चिंतनशील आणि वाचनीय झालेली आहे.
प्रा. विजयकुमार खंदारे यांनी शरणकुमार लिंबाळे यांच्या मुलाखतींचे संपादित केलेले ‘समन्वय’ हे पुस्तक आणि लिंबाळे यांची ‘वंदे मातरम्’ ही कादंबरी यांची तुलना होऊ शकते. या दोन्ही पुस्तकांतून लेखकांनी अतिशय महत्त्वाची आणि मूलगामी मते मांडली आहेत. दलित साहित्य आणि दलित चळवळ यची आक्रमक आणि एकाकी प्रवृत्तीमुळे जी हानी झाली आहे, त्याकडे लिंबाळे अंगुली निर्देष करताना दिसतात. लिंबाळे यांची मते सडेतोड आणि परखड आहेत. दलित चळवळ आणि दलित साहित्य याला ‘आवर्तातून कसे बाहेर पडावे’ याविषयीचे मार्ग दाखवणारी ही कादंबरी आहे. अतिरेकी विचार मग तो कोणत्याही समाजातून व्यक्त होवो तो कसा घातक आहे, याचे प्रत्ययकारी चित्रण लेखकाने केलेले आहे. ‘वंदे मातरम्’ ही कादंबरी वाचताना अनेकवेळा लेखकाची आत्मकथाच वाचत आहोत असा भास निर्माण करते.
लिंबाळे हे मराठीतले महत्त्वाचे लेखक आहेत. त्यांनी नेहमीच आपल्या लेखनामध्ये नवनवे प्रयोग केलेले आहेत. त्याकडे समीक्षकांचे दुर्लक्ष झालेले दिसते. लिंबाळे यांनी आपल्या कादंब-यांमध्ये अनेक प्रयोग केलेले आहेत. ‘उपल्या’ ही कादंबरी लिहिताना त्यांनी कथा, आत्मकथा निवेदने आणि दैनंदिनी या लेखनप्रकाराचा वापर कौशल्याने केलेला आहे. एका कादंबरीत इतक्या वेगवेगळया प्रकारात लेखनप्रकार कधी कुणी वापरले नाहीत. ‘हिंदू’ कादंबरीमध्ये सुद्धा आत्मकथा आणि तृतीय पुरूशी एकवचनी लेखन या पद्धतीचा वापर केलेला दिसून यतो. तर त्यांच्या ‘सनातन’ या कादंबरीमध्ये इतिहासलेखन आणि ललितलेखन याचा यशस्वी वापर केलेला दिसून येतो. लिंबाळे हे प्रयोगशील लेखक आहेत. त्यांच्या लेखनात सतत नावीण्यपूर्णता आढळून येते. ‘वंदे मातरम्’ देखील याला अपवाद नाही. ‘वंदे मातरम्’ वाचताना अनेकवेळा कादंबरी वाचल्याचा भास होतो आणि त्याचवेळी आत्मकथाही वाचत असल्याचा अनुभव मिळतो.
आत्मकथा आणि कादंबरी वाड्ःमयीन प्रकाराचा अनुभव देणारी कलाकृती म्हणून ‘वंदे मातरम्’कडे पाहाता येईल. जीवनमूल्ये आणि वाड्ःमयमूल्ये यांचा सुरेख संगम या कादंबरीत झालेला दिसून येतो.

प्रा. विजयकुमार खंदारे
मराठी विभागप्रमुख, इंद्रायणी कॉलेज, तळेगाव-दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे
पुस्तकाचे नाव : वंदे मातरम्
लेखक : शरणकुमार लिंबाळे
प्रकाषन : दिलीपराज प्रकाषन प्रा. लि.
251, क, शनिवार पेठ, पुणे-30
स्वागत मूल्य : 300/-
एकूण पृष्ठ संख्या : 200
पत्रव्यवहारासाठी पत्ताः
प्रा. विजयकुमार रामा खंदारे
ई-01, फ्लॅट नं. 03,
लाला साईराज पार्क रेसिडेन्सी,
सर्व्हे नं. 38/1, नवी सांगवी, पिंपळे गुरव,
पुणे-411061
मोबा. 9422569249
Mail Id : hodmarathi@gmail.com