दीपक जाधव
मासिक पाळीच्या विषयावर आम्ही नाटकाचा अर्धा भाग सादर केला आणि नाटक फ्रिज अवस्थेत थांबले…आता प्रेक्षकांनी उठून येऊन उरलेले नाटक पूर्ण करणे अपेक्षित होते. अवघे 12 ते 13 वर्षांचे वय असलेली मुस्कान मोठ्या आत्मविश्वासाने ती पुढे आली. मासिक पाळीच्या विषयावर मुद्दा क्रमांक 1, 2 , 3 अशी अगदी जबरदस्त मांडणी केली. तिच्या या तर्कशुद्ध मांडणीने आम्ही उपस्थित सगळेच भारावून गेलो. ऑगस्तो बोलच्या TOTO या माध्यमाची ताकद काय आहे याचा जिवंत अनुभव ही यातून मिळाला.

पॉवर ऑफ थिएटर ग्रुपच्या शोषितांचे नाटक (theatre of Oppressed) म्हणजेच TOTO या नाटकाचा दुसरा प्रयोग पाटील इस्टेट येथील मनोदय व्यसनमुक्ती संस्थेत करण्यात आला.पहिले नाटक दारूचे दुष्परिणाम या विषयावर तर मासिक पाळी यावर दुसऱ्या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. दीपक जाधव, आशिष तिखे, श्रीकांत मिश्रा, अपूर्वा तिखे, अर्चना ढोले, चैतन्य जोगदंड यांनी नाटकाच्या सादरीकरणात सहभाग घेतला. वैशाली पाटील, विश्वास नाडे यांनी यासाठी सहाय्य केले. मनोदय व्यसनमुक्ती संस्थेचे संचालक विष्णू श्रीमंगले, समुपदेशक सूरज शिंदे, काजल रणसुरे यावेळी उपस्थित होते.पहिल्या नाटकात दारू पिऊन नवरा घरी आल्यानंतर भांडणाला सुरुवात झाल्याचे चित्र दाखवून तिथे ते थांबवण्यात आले. त्यानंतर उपस्थित मुलांना दारू पिऊन आलेल्या व्यक्तीच्या बायकोची भूमिका करायला पुढे बोलावले गेले. त्यानंतर 13 -14 वर्षांची मुले, मुली पुढे येऊन भन्नाट बोलली.
दुसरे नाटक तसे मासिक पाळी सारख्या अवघड विषयावरचे होते. कारण किशोरवयीन मुला-मुलींसमोर या नाटकाचे सादरीकरण करायचे होते. नाटक अर्ध्यात थांबवून त्यांना नाटक पूर्ण करण्यासाठी बोलवायचे होते. हा अवघड टास्क असेल, मुले बोलण्यासाठी पुढे येणार नाहीत असे वाटत होते. मात्र प्रत्यक्षात उलट झाले, मुले व मुली उत्स्फूर्तपणे पुढे आली एवढेच नाही तर अत्यंत तर्कशुद्ध मांडणी त्यांनी केली.