पोरा-पोरींसह भरलेले आणि बहरलेले लेकुरवाळे विद्यापीठ मला ही डोळे भरून पहायचे आहे

You are currently viewing पोरा-पोरींसह भरलेले आणि बहरलेले लेकुरवाळे विद्यापीठ मला ही डोळे भरून पहायचे आहे

प्रिय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,

आज तुझ्या स्थापनेला 73 वर्षे पूर्ण होत आहेत. पहिल्यांदा तुला या 73 व्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्याशी खूप दिवसांपासून बोलायचं होत. म्हटलं आज तुझा वाढदिवस, तर आजच पत्र लिहून बोलूयात.

माझा तुझ्याशी संबंध तसा 16 वर्षांपूर्वी आला. मला तुझ्या राज्यशास्त्र विभागात ऍडमिशन मिळाले. तसा सोलापूरहून एक सुटकेस घेऊन एका संध्याकाळी विद्यापीठात आलो होतो. हळूहळू दिवस पुढे सरकत गेले. तुझ्या सहवासात मी घडू लागलो, वाढू लागलो, शिक्षण घेऊ लागलो. माझ्यातले अनेक पूर्वग्रह इथं गळून पडू लागले. माझा वैचारिक विकास होऊ लागला.

इथं खूप काही शिकायला मिळाले, वर्गात जितका शिकलो त्याही पेक्षा जास्त तुझ्या कॅम्पसमधल्या जगण्यातून शिकायला मिळाले. जयकर ग्रंथालयामध्ये बसून केलेला तासन तास अभ्यास, अनिकेत कॅन्टीनमध्ये मित्र-मैत्रिणींशी मारलेल्या गप्पा आज ही तितक्याच ताज्या वाटतात.

नंतर पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला, पत्रकार झालो. हॉस्टेलमधला मुक्काम संपल्यानंतर तुला सोडून सांगवीतल्या रूमवर राहायला जाताना ढसाढसा रडलो होतो.

पत्रकारिता करताना वेगवेळ्या बीटवर काम करत होतो, मात्र त्यावेळी विद्यापीठात काय घडतं आहे, यावर कायम लक्ष ठेवून असायचो. नंतर मला एज्युकेशन बीट मिळाल्यानंतर तर दररोज विद्यापीठातच ठाण मांडून बसू लागलो. शेकडो बातम्या केल्या.

तुझ्याविषयी मला असलेल्या अपार जिव्हाळ्यामुळे इथं होत असलेल्या गैरव्यवहाराची माहिती मिळतात माझा संताप व्हायचा, आज ही होतो. मी त्यावर तुटून पडतो. जागल्याच्या माध्यमातून स्वतंत्र पत्रकारिता करू लागल्यानंतर तर याविषयी अधिक धाडसाने आणि कोणत्याही दबावाविना लिहू लागलो आहे. यामुळे काही चुकीच्या गोष्टींना तरी नक्की आळा बसतो आहे, याचे समाधान आहे.

मी गावाकडून इथं येताना घरून एक रुपया ही आणता कमवा व शिका योजनेमुळे माझं सर्व शिक्षण सहजपणे पूर्ण करू शकलो. माझ्याप्रमाणे असेच गावाकडून शेकडो विद्यार्थी इथे आले. शिकून मोठमोठे अधिकारी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, संशोधक अस बरंच काही झाले. ही परंपरा तशीच टिकून रहावी, इथं येणाऱ्या विद्यार्थ्यांना विना अडथळा शिक्षण घेता यावं, यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून मला शक्य तितकी धडपड करत असतो.

माझी आयुष्यभराच्या जोडीदाराशी तूच इथं भेट घालून दिलीस. तू खूप काही आम्हांला दिलं आहेस, ते सगळंच शब्दात सांगता येणार नाही. तुझे विद्यार्थी असल्याचा आम्हांला खूप अभिमान आहे.

पण इथं गैरव्यवहार करणारे, तुला लुबाडणारे मला म्हणतात की, मी बातम्यांद्वारे तुझी बदनामी करतोय. गैरव्यवहार बाहेर आल्याने बदनाम तर तुला लुबाडणारे होत आहेत पण ते तुझ्या मोठ्या नावापुढे आपली काळी कृत्य लपवू पाहत आहेत. त्यांनी किती ही प्रयत्न केला तरी आता ते शक्य होणार नाही.

हा, तुला लुबाडणाऱ्यांकडे बरेच दिवस समाजाचे दुर्लक्ष झाले हे खरे आहे. त्यामुळे त्यांचे चांगलेच फावले ही आहे. असो, आता मात्र चौकशी, समित्या असं बरंच काही सुरू झाले आहे. वेळ लागेल, खूप पाठपुरावा करत रहावा लागेल. तो सर्व आम्ही करू पण तुला लुबाडणाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय शांत बसणार नाही, हे नक्की. शेवटी, हे लढण्याचे बळ तर तुझ्याच शिक्षणातून मिळाले आहे ना…

बाकी, गेली 2 वर्षे कोविडमुळे कॅम्पस बंद राहिला. इथं विद्यार्थ्यांविना तुला पाहताना खूप कसंतरीच वाटायचं. तुला ही त्यांच्याशिवाय एक-एक दिवस काढणं खूप कठीण जात आहे, हे सगळं कळतंय मला. आता ऑफलाईन शिक्षण पुन्हा सुरू झालंय. वसतिगृह सुरू करण्याचे आदेश ही कालच उच्च शिक्षण मंत्री कुलगुरूंना देऊन गेलेत. पुन्हा आपला कॅपम्स बहरणार आहे. या सगळ्या पोरा-पोरींसह भरलेले आणि बहरलेले लेकुरवाळे विद्यापीठ मला ही डोळे भरून पहायचे आहे…..

तुझाच लाडका,
दीपक जाधव

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply

This Post Has One Comment

  1. Padmakar

    खूप सुंदर, भावपूर्ण आणि मनापासून लिहिलेला असा हा लेख आवडला. तुमच्या आणि जागल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा आणि प्रार्थना!